खानापूर प्रतिनिधी
गेल्या दिड दोन महिन्यांपासून कणकुंबी आणि आसपासच्या परिसरातील गांवे महिनाभरापैकी जवळपास वीस दिवस अंधारात असून सतत खंडित वीजपुरवठ्यामुळे वैतागलेल्या युवकांनी काल मंगळवारी कणकुंबी येथे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून चांगलाच पानं उतारा केला.
कणकुंबी ग्रामपंचायतीमध्ये हेस्कॉमच्या जांबोटी सेक्शन ऑफिसरला डांबून ठेवण्याचा निर्णय कणकुंबी युवकांनी घेतला.जो पर्यंत हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता कणकुंबीला येऊन वीद्युत पुरवठ्याबध्दल ठोस उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत सेक्शन ऑफिसरला डांबून ठेवण्यात आले होते.त्यांनंतर सहाय्यक कार्यकारी अभियंता काही वेळातच कणकुंबीला हजर झाले.यावेळी जवळपास एक महिन्यापासून खंडित वीजपुरवठ्यामुळे वैतागलेल्या युवकांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला.कणकुंबी भागात फक्त जंगली जनावरं राहतं नाहीत,तर माणसं देखील राहतात यांची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.माणसांना लागणाऱ्या सोयी सविधा पुरवणं हे प्रशासनाचे काम असून हेस्कॉमने कणकुंबी भागावर नेहमीच फार मोठा अन्याय केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागातील लोकांना खंडित वीद्युत पुरवठ्याबध्दल सामना करावा लागतो.यावर्षी मात्र कणकुंबी भागातील नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या दिड दोन महिन्यांपासून कणकुंबी भाग संपूर्णपणे अंधारात असून हेस्कॉमचे कर्मचारी व सेक्शन ऑफिसर केवळ टाइमपास करत असतात.मद्य प्राशन करून नागरिकांना उद्धट उत्तरे देतात.कणकुंबी भागातील सर्व नागरिक हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला वैतागून गेले आहेत. गेल्या जून महिन्यात तर सलग आठ आठ दिवस वीज गायब होती.त्यानंतर दि.२७ जूनला गेलेली लाईट अद्याप पर्यंत आलीच नाही. आम्हाला तुमची लाईटच नको, लाईट नसताना लाईट बिल कसे भरायचे यांचे उत्तर द्या,जर उद्या (बुधवार पर्यंत) लाईट आली नाही तर सेक्शन ऑफिसरने राजीनामा द्यावा किंवा सेवेतून निलंबित करावे अशा मागण्या युवकांनी मोठ्या आवेशात मांडल्या.
यावेळी इस्कॉनच्या तालुका अधिकाऱ्यांनी प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की उद्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लाईट येईल जर नाही आली तर सेक्शन ऑफिसरचा राजीनामा तुमच्याकडे सादर करतो. तसेच या भागात अनेक वर्षांपासून अंडरग्राउंड केबलची मागणी आहे त्यासाठी आपण शासन दरबारी नक्कीच पाठपुरावा करतो. सध्या चिखले क्रॉस ते कणकुंबी पर्यंतची लाईट जंगलामधून गेलेली आहे.त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करण्यास अडचण येत आहे.कणकुंबी वन खात्याने परवानगी दिली तर बेळगाव चोर्ला रस्त्यांच्या बाजूने चिखले ते कणकुंबीपर्यंत लाईट येत्या दोन महिन्यात आपण पूर्ण करून देऊ शकतो अशी ग्वाही दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण गावडे तसेच कणकुंबीचे युवा कार्यकर्ते अभय नाईक, मंगेश नाईक, विठ्ठल गवस, सागर नाईक, प्रदिप खोरवी,शिवराज मुगुटकर,वामन पेडणेकर, आकाश महाले व गावातील बहुसंख्य युवक उपस्थित होते.
कणकुंबी भागात गोवा विद्युत पुरवठ्याची मागणी
कणकुंबी भागातील सर्व गावांचा वीजपुरवठा दरवर्षीच त्रासदायक ठरत आहे.गेल्या दिड दोन महिन्यांपासून कणकुंबी भागातील नागरिक खंडित वीजपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने कणकुंबीसह काही गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होत असून पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रास होत असून अभ्यासावर परिणाम होत आहे. परिणामी दैनंदिन जीवनमान कोलमडत आहे. त्यामुळे कणकुंबी परिसरातील नागरिकांतून हेस्कॉमच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे वैतागलेल्या कणकुंबी भागातील नागरिकांनी खानापूर हेस्कॉमच्या वीज पुरवठ्या ऐवजी गोव्यातून वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. जर गोव्यातून वीजपुरवठा झाला तर आपण लाईट बिल सुद्धा भरायला तयार आहोत.कर्नाटक सरकार आम्हाला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरले तर आम्ही गोवा सरकारशी भेटून प्रयत्न करणार असल्याचे युवकांनी सांगितले.