संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगाव (ता.खानापूर )येथील जागृत देवस्थान श्री फोंडेश्वर देवाची यात्रा आज सोमवार दि. २ ते दि. ३ रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने सोमवारी सायंकाळी ७ वाजता देवाचा पालखी सोहळा, त्यानंतर रात्री १२ वाजता ‘इंगळ्यांचा’ कार्यक्रम होणार आहे.
तसेच दि. ३ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी ८ वाजल्यापासून दिवसभर ओटी भरणे व नैवेद्यादी कार्यक्रम होणारं आहे. तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंच यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
चापगाव येथील फोंडेश्वर देवस्थानला पुरातन काळाचा इतिहास आहे. या ठिकाणी असलेले फोंडेश्वर देवस्थान महाभारतातील हस्तीनापूर साम्राज्याचे हंसध्वज राजा यांच्या काळातील राजवटीशी संबंधित असल्याचे मानले जाते. जेंव्हा अश्वमेध यज्ञाचा घोडा पृथ्वीभ्रमण करत होता. त्यावेळी तो घोडा हंसध्वज राजाचे पुत्र सूरत आणि सुधन्वा यांनी अडवून अर्जुनाशी घनघोर युद्ध केले. या युद्धाला भगवान श्रीकृष्ण साक्षी होते. अर्जुनाप्रमाणे सुधन्वाही श्रीकृष्ण भक्त होता. दोघांच्या युद्धात श्रीकृष्णाला साक्षी ठेवून घनघोर युद्ध झाले.
यामध्ये सूरत, सुधन्वा वीरगतीला प्राप्त झाले. दोघेही योद्धे वीर अर्थात पुंढ होते. म्हणून या देवस्थानला फोंडेश्वर असे कालांतराने नाव पडले. यामुळे आजही या ठिकाणी लहान फोंडेश्वर व मोठा फोंडेश्वर अशा दोन मूर्त्या एकाच मंदिरात स्थापित आहेत. यापैकी एका देवाच्या नावे गोड नैवेद्य तर एकाच्या नावे मांसाहारी नैवेद्य करण्याची प्रथा आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

