संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कॅनरा बँक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत कणकुंबी गावातील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेला स्मार्ट पॅनल बोर्ड तसेच येथील श्री माऊली विद्यालय हायस्कूला स्मार्ट पॅनल बोर्ड आणि विद्यार्थिनींसाठी शौचालय व कणकुंबी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी वॉटर प्युरिफायर अशा विविध कामांसाठी कॅनरा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून मंजुरीचे पत्र सादर केले.
कणकुंबी येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बेळगाव विभाग कॅनरा बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीविद्या तसेच इतर अधिकाऱ्यांनी कणकुंबी येथील कार्यक्रमात सहभागी होऊन संबंधित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एड.डी, मुल्ला, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस जी चिगुळकर व ग्रामपंचायतीचे पीडीओ सुनील अंबारे या संबंधितांकडे मंजुरी पत्र देऊन दहा लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची यावेळी माहिती देण्यात आली. कॅनरा बँकेच्या सीएसआर फंडातून कणकुंबी गाव दत्तक घेण्यात आलेले असून गावासाठी वॉटर प्युरिफायर , श्री माऊली विद्यालय हायस्कूल व प्राथमिक शाळेला स्मार्ट क्लास, हायस्कूलमध्ये हायटेक शौचालय बांधण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जाईल अशी घोषणाही करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना कॅनरा बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीविद्या यांनी घोषित कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी प्रकल्पाची माहिती दिली. चांगल्या दर्जाच्या उपकरणांचा वापर केल्याने प्रकल्प निधी योग्यरित्या खर्च होईल याची खात्री होईल. सध्या १० लाख रुपयांची कामे हाती घेतली जात आहेत. कनकुंबी शाखा व्यवस्थापक अण्णा रेड्डीच्या प्रयत्नांमुळे कणकुंबी गावाची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना बँकेचे विभागीय व्यवस्थापक दिनकर म्हणाले की, महान शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की प्रत्येकाने मोठी स्वप्ने पहावीत. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम करावेत आणि त्यांची स्वप्ने सत्यात उतरवावीत. या दिशेने वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन न वापरता खेळ आणि अभ्यासामध्ये सहभागी व्हावे आणि मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट व्हावे. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले व्यक्ती बनण्यासाठी आणि देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी वाटचाल करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कॅनरा बँकेचे विभागीय व्यवस्थापक बागवान व के प्रशांत, कणकुंबी बँकेचे शाखा व्यवस्थापक अण्णा रेड्डी, ग्रामपंचायत अध्यक्षा दीप्ती गवस, पंचायत विकास अधिकारी सुनील अंबारे, एसडीएमसी अध्यक्ष उमेश गावडे,पंच राजाराम गावडे, लक्ष्मण गावडे, ग्रामस्थ ,दोन्ही शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सन १९८९ पासून कणकुंबी परिसरातील जवळपास २५ ते ३० खेड्यांसाठी सिंडिकेट बँक सुरू करण्यात आली होती.सिंडिकेट बँकेचे आता कॅनरा बँकेत विलीनीकरण झाले.बॅंकेच्या सुमारे तीस वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच सीएसआर चा निधी मंजूर करण्यात आल्याने कणकुंबी आणि परिसरातील ग्राहक वर्गामध्ये व ग्रामस्थांमध्ये कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांचे व शाखा व्यवस्थापक अण्णा रेड्डी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

