#सोमवारी समितीच्या वतीने तालुक्यातील समस्या बाबत निवेदन देणार : माजी आमदार दिगंबर पाटील !
#सीमाप्रश्नबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार : बैठकीत विविध विषयावर चर्चा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकारी समितीचे नियुक्ती केली असून सीमा प्रश्न बळकटी देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले आहे. त्याबद्दल खानापूर समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करत आहोत. तसेच खानापूर तालुक्यातील रस्त्याची समस्या, वीज पुरवठा खंडित समस्या आणि सरकारी इस्पितळात मराठी फलक याबाबत सोमवारी दि. ३० रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. ते शुक्रवारी खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुका म. ए. समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीत बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई हे होते.
बैठकीचे प्रास्ताविक आणि स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी दिवंगत झालेल्या म्हणीय व्यक्ती आणि तालुक्यातील व्यक्तीना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील बोलताना म्हणाले की सीमा प्रश्न बाबत बळकटी आणायचे असेल तर महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भेटणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्ष गोपाळ देसाई व माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट महिन्यांमध्ये खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटीचे नियोजन करावे. त्यासाठी मध्यवर्ती समितीला कल्पना देऊन पुढील कार्यवाही करावी असेही त्यांनी सुचित करण्यात आले त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. गोपाळ पाटील म्हणाले की उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अगोदर सदर समितीत ५ सदस्य होते. आता जवळपास सर्वपक्षीय १८ सदस्यांची उच्चाधिकारी समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. उच्चाधिकारी समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असले तरी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करावी असा ठराव त्यांनी मांडला आणि त्या ठरावाला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला. अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी बोलताना म्हणाले की समितीच्या बैठकीला नियमित उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. मध्यवर्ती समितीच्या सूचनेनुसार आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी मध्यवर्ती सदस्यांनी नियमितपणे बैठकीला हजर राहून समस्या सोडवण्याबाबत पुढाकार घ्यावा. यावेळी रुक्मणा झुंजवाडकर आणि आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मध्यवर्ती सदस्य पदी वसंत नावलकर, राजाराम देसाई, विठ्ठल गुरव,मर्याप्पा पाटील यांची निवड करण्यात आली तर तालुका कार्यकारणीवर भीमसेन करंबळकर यांची निवड करण्यात आली.
बैठकीला विठ्ठल गुरव, प्रकाश चव्हाण, पांडुरंग सावंत, अजित पाटील, रणजीत पाटील, डी.एम. भोसले, भीमसेन करबळकर, संजीव पाटील, राजाराम देसाई, कृष्णा कुंभार, ब्रह्मानंद पाटील, वसंत नावलकर, सुधीर नावलकर, म्हात्रू धाबले, शंकर गावडा, मर्याप्पा पाटील व आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.