#जांबोटी माध्यमिक विद्यालयात बेळगाव राॅयल राऊंड टेबलच्यावतीने कुस्तीमॅटचे उदघाटन उत्साहात संपन्न!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
“विद्यार्थी दशेत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत. अपयश आल्यानंतर खडतर परिश्रमाने त्याचे यशात रूपांतर करणे हे ज्याला जमतं ते यशस्वी होतात. जांबोटी माध्यमिक विद्यालयात चा सुंदर परिसर, कष्टाळू शिक्षक वर्ग आणि प्रचंड आत्मविश्वास असणारे विद्यार्थी पाहून खूप आनंद होत आहे” असे गौरव उद्गार बेळगावचे जिल्हाधिकारी श्री महंमद रोशन यांनी काढले.
जांबोटी (तालुका खानापूर )येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात बेळगाव रॉयल राऊंड टेबल च्या वतीने कुस्ती मॅट तयार करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते
ते पुढे म्हणाले “आपले लक्ष निश्चित करून आपण त्या दिशेने परिश्रम केले पाहिजेत. कष्ट करणाऱ्यांना कधीच त्यांची आर्थिक परिस्थिती आड येत नाही. आज अनेक आयएएस अधिकारी आहेत जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घडले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता भविष्य घडविण्यासाठी समर्थ असले पाहिजेत.”
यावेळी त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल कौतुक केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी श्री रोहित सिंग यांनी फीत कापून कुस्ती व्यायाम शाळेचे उद्घाटन केले.
व्यासपीठावर बेलगाम रॉयल राऊंड टेबल चे चेअरमन वरून पाटील. विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळली, बेळगाव फाउंड्री क्लस्टरचे संचालक आनंद देसाई, कार्तिक मिस्कीन , रोहन सुंठणकर आयुष्य दालमिया,
क्रीडा भारतीचे राज्याध्यक्ष अशोक शिंत्रे,
लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम कृष्णजी देसाई हे व्यासपीठावर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी प्रास्ताविक व उपस्थित यांचे स्वागत केले. वरून पाटील आनंद देसाई यांची समायोजित भाषणे झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच विद्यालयाच्या विकासासाठी आपण नेहमी सोबत राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी कुस्ती राज्यस्तरीय मिनी ओलंपिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. श्रावणी भरमाना पाटील (कुसमळी), भक्ती मनोहर गावडे ( मोदी कोप) तनुजा रवींद्र गुरव (खानापूर) त्रिवेणी विठ्ठल गावडे ( आमगाव) यांचा सन्मान करण्यात आला. गावातील युवा वर्ग पंचमंडळी व पालक वर्ग उपस्थित होते. सहशिक्षक दिनकर पाटील यांनी आभार मानले
