संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात २०२५-२६ सालाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. जे. बी. अंची उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ सदस्य परशुरामअण्णा गुरव उपस्थित होते. समारंभाला उद्घाटक म्हणून खानापूर येथील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. जवळकर उपस्थित होते.
यावेळी ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की, “आधुनिक युगात नवशिक्षित तरुणांना विविध संधी उपलब्ध आहेत. जागतिकीकरणाच्या बळावर सारे जग जवळ आले आहे. अशा स्थिती तरुणांनी प्रादेशिक भाषांच्या वादातून बाहेर पडत नव्या संधी शोधत स्वतःसह परिसराचा विकास साधला पाहिजे. तरच आपल्यासह आपल्या परिसराची प्रगती होईल.” असे त्यांनी यावेळी उद्गार काढले या समारंभाला प्रमुख वक्ते म्हणून खानापूर येथील रावसाहेब वागळे महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक प्रा. शंकर गावडा उपस्थित होते. ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की, “तुम्हाला ध्येयवंत बनायचे असेल तर कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही. तालुक्याच्या दुर्गम अतिदुर्गम गावातून मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. ही चांगली बाब आहे. मात्र शहराच्या ठिकाणी येऊन मुले व्यसनांध बनतात आणि आई वडिलांचे स्वप्न धुळीस मिळवतात. ही सद्यस्थिती ओळखून विद्यार्थ्यांनी सावधपणे पावले उचलावीत” असे विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी आवाहन केले. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय डॉ. आय. एम. गुरव यांनी केला. कार्यक्रमाला डॉ.आर. एस. तिरवीर, प्रा. कपिल गुरव विद्यार्थी प्रतिनिधी कु. स्नेहल कोळी, प्रतिनिधी कु. स्नेहल इंगळे आदी उपस्थित होते. जिमखाना उपाध्यक्ष डॉ.आर. एस. तिरवीर यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा सप्ले यांनी केले. तर आभार प्रा. ज्योती तरळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.


