
#माहेरवासिनीचा स्वागत समारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
नागुर्डा (ता.खानापूर ) परिसरातील नागुर्डावाडा,विश्रांतवाडी गावचे ग्राम दैवत श्रीनागेश महारुद्र मंदिराचे चौकट पूजन व माहेरवासिनींचा स्वागता समारंभ सोहळ नागुर्डावाडा येथे मंगळवार दि.२२ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी तीनही गावच्या माहेरवासीनी व ग्रामस्थ मिळून शेकडो भाविक उपस्थित होते.
प्रारंभी सकाळी आठ वाजता मंदिराच्या समोरील चौकटीचे पूजन देणगीदार सौ व श्री नागेश परवाडकर यांनी केले. मंदिरातील गाभाऱ्याच्या चौकटीचे पूजन सौ व श्री नागेश रवळू वडगावकर यांनी केले. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौकटींचे पूजन बाळकृष्ण हनुमंत पाखरे यांनी केले. या प्रसंगी महेर वासिनींसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिजीत उदयसिंह सरदेसाई होते. यावेळी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष निरंजन उदयसिंह सरदेसाई, नागुर्डा ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. पूजा अण्णाप्पा चाळगोंडे, माजी अध्यक्ष परशराम हनुमंत पाखरे, लक्ष्मण खांबले, तानाप्पा चापगावकर, कृष्णाजी पाटील, कृष्णा महाजन, सौ. विजयालक्ष्मी कृष्णाजी पाटील, हभप अशोक पाटील,. धाकलू कुंभार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर फोटो पूजन आप्पाजी देसुरकर, . अनंत चापगावकर, धाकलू बिरजे, सौ. माधुरी पाटील, प्रवीण सायनाक, पीडीओ नागुर्डा ग्रामपंचायत, रवळू दत्तू वडगावकर, मुकुंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व मंदिर जीर्णोद्धार कमीटीचे कृष्णा गोविंद धुळ्याचे यांनी प्रास्ताविक केले व मंदिराचा जमाखर्च वाचून दाखवला. माहेरवासिनीं मधून दोड्डहोसुरच्या सौ. लीला सोनारवाडकर यांनी आपल्या माहेराविषयी आपली ओढ का असते यावर आपले मत मांडले. कार्यक्रमाला निमंत्रित वक्त्या म्हणून आलेल्या सौ. कीर्ती विष्णू पाटील, शिक्षिका यांनी स्त्रियांच्या जीवनावर अत्यंत सुरेख असे विचार मांडले. त्यात स्त्री-पुरुष समता, स्त्रीयांची जबाबदारी व स्त्रीयांचे आपसातील वर्तन यावर भर देत अनेक बाबतीत योग्य असे मार्गदर्शन केले. नंतर निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी मंदिराचे काम कुठेही न थांबता पूर्ण होत आहे अशी माहिती उपस्थितांना दिली. गावातील सर्व कामे करताना एकी कायम ठेऊन सर्वांचा मान राखून करवून घेत आहोत असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी समस्त महिलावर्गाचा सन्मान करण्यासाठी व त्यांचाही सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी तीन गावच्या माहेरवासीनींना आमंत्रण देण्यात आल्याचे सुतोवाच केले. तसेच कार्यक्रमासाठी आणखी एक वक्त्या प्राचार्या सौ. शरयु कदम, रावसाहेब वागळे प. पू. कॉलेज खानापूर, यांनी सुद्धा स्त्रियांच्या विषयी बोलताना दाम्पत्य जीवनामध्ये चढउतार येतात पण त्यांच्यातले ऋणानुबंध तसेच राहतात हे पटवून दिले. नंतर त्यांनी आपल्या तालुक्यात होणाऱ्या आत्महत्या या गंभीर विषयावरही मत मांडले.
शेवची अध्यक्षीय भाषणात अभिजीत उदयसिंह सरदेसाई यांनी मंदिर उभारणी कशासाठी आहे हे विषद करताना तेथे केवळ पूजन आणि आरत्या करायच्या नसून ते संस्कार केंद्र, बालोपासना केंद्र निर्माण व्हावे असे सांगितले. आपण श्रद्धेने पूजन करावे पण त्यात अंधश्रद्धा डोकावू नये हे पाहिले पाहिजे असे ते म्हणाले. शेवटी मंदिर उभारताना गावातील शाळेकडे दुर्लक्ष होणार नाही हेही पाहावे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागुर्डा येथील महिला बचत गटातील महिलांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कृष्णाजी पाटील यांनी केले.