संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शालेय जीवनानंतर खऱ्या आयुष्याला सुरुवात होते, आयुष्य फार सुंदर आहे. ते जगता आलं पाहिजे. वेळ गेल्यावर पश्चाताप करून आयुष्य जगायचं राहून गेलं असं म्हणण्यापेक्षा आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन चांगलं आयुष्य जगलात तर जीवन सार्थक झाले असे म्हणता येईल. तेव्हा प्रत्येकांनी आपापल्या सेवेला आलेले कार्य प्रामाणिकपणे करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते.कामात “सेवा” या शब्दाला महत्त्व आहे. असे मत सेवानिवृत्त शिक्षक एम एस किल्लेकर यांनी व्यक्त केले.किल्लेकर हे कणकुंबी येथील विश्व भारत सेवा समिती संचलित श्री माऊली विद्यालयाच्या सन 1988- 99 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस जी चिगुळकर होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन तर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध फोटो पूजन करण्यात आले.त्यानंतर माजी विद्यार्थी अमृत गवस यांनी प्रास्ताविक भाषण करून उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक एस जी चिगुळकर, तत्कालीन प्रभारी मुख्या.एम एस किल्लेकर, विज्ञान शिक्षक डी.डी.हळदणकर, क्रीडा शिक्षक टी एल बिर्जे,बी.एम.शिंदे,एस.आर.देसाई, प्राथमिक शाळेचे मुख्या.एस डी मुल्ला आदी शिक्षकांचा मानचिन्ह,शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. हायस्कूलसाठी माजी विद्यार्थ्यांनी दोन “स्टॅंडींग फॅन” तर प्राथमिक शाळेसाठी ऑफिस टेबल भेटीदाखल दिले.
स्नेहमेळाव्याची सुरुवात अमृत गवस यांनी “सत्यंम शिवम् सुंदरा” या प्रार्थनेने केली.तसेच अमृत गवस यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनात गुरूंचे महत्त्व पटवून दिले तसेच मित्र मैत्रिणींचा सहवास किती महत्त्वाचा आहे हे सांगून शालेय जीवनातील आठवणींचे सुंदर विवेचन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल वरंडेकर, सुनील नाईक, बबन नाईक, संतोष नाईक तर माजी विद्यार्थीनी गुलाब पंडित, मेघना नाईक, सुरेखा गावस, शितल वाडेकर व इतर सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन एन.एस.करंबळकर यांनी केले तर अनिल वरंडेकर यांनी आभार मानले.



