संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
१ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या ‘काळादिना’बाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत तालुक्यात पत्रके वाटण्यात येणार असून, या नियोजनासाठी उद्या रविवार दि. २५रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारक येथून खानापूर शहरांत तसेच आठवडी बाजारात जनजागृतीची पत्रके वाटण्याचे ठरविण्यात आले आहे.
या मोहिमेला म.ए. समितीच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वरिष्ठ नेत्यांनी केले आहे.
१ नोव्हेंबर हा दिवस सीमाभागात दरवर्षी ‘काळादिन’ म्हणून पाळला जातो. यंदाही हा निषेध लढा तीव्र करण्यासाठी आणि प्रत्येक घराघरापर्यंत काळादिनाचा संदेश पोहोचवण्यासाठी पत्रक वाटप मोहीम राबवली जाणार आहे. पत्रकांचे वाटप खानापूर शहर तसेच तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ जांबोटी येथे दि. २७ ऑक्टोबर आणि नंदगड येथे दि. २८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
तरी सर्व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.