संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिक्षक भरती नोटीफिकेशन मध्ये मराठी माध्यमावर जो अन्याय झाला त्या संबंधी चर्चा करण्यात आली आणि त्वरित मराठी माध्यमासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी फक्त खानापूर तालुक्यात १९५ मराठी शिक्षकांची कमी आहे त्याचबरोबर पूर्ण कर्नाटक मध्ये ५८० ते ६५० शिक्षकांची कमी आहे त्यामुळे मराठी माध्यमातील शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता, कर्नाटक सरकारला सध्याच्या भरती अधिसूचनेचा त्वरित आढावा घेण्यात यावा आणि अधिसूचना काढावी.
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जिथे खरोखरच रिक्त जागा उपलब्ध आहेत, तिथे त्या जागांचा समावेश करण्यासाठी सध्याची अधिसूचना रद्द करून सुधारित प्रक्रिया राबवावी.
भरती प्रक्रिया अशा प्रकारे राबवण्याचा विचार करावा ज्यामुळे आवश्यक पात्रता आणि संबंधित भाषिक माध्यमाचे कौशल्य असलेल्या पात्र उमेदवारांना संबंधित पदांसाठी स्पर्धा करण्याची समान संधी मिळेल आणि ‘आरटीई (RTE) कायदा २००९’ अंतर्गत शिक्षकांचे प्रमाण (शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर) पूर्ण करता येईल.
संविधानातील अनुच्छेद ३५०-ए आणि ‘आरटीई कायद्या’ची उद्दिष्टे लक्षात घेऊन, भाषिक अल्पसंख्याक मातृभाषा माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलांना पात्र शिक्षक उपलब्ध होतील याची खात्री करावी.अशा आशयाचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले.निवेदनाचा त्वरित पाठपुरावा करू शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी या विषयी चर्चा करून मार्ग काढुया असे मंत्री जारखीहोळी यांनी सांगितले यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, युथ काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार,राष्ट्रवादी बेळगाव जिल्हा सेक्रेटरी महांतेश कोळूचे आणि इतर उपस्थित होते.
