#नागरीकांनाअनेक समस्याशी करावा लागतो सामना!
#लोकप्रतिनिधी व तहसीलदारानी लक्ष देने गरजेचे!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
माडीगुंजी (ता.खानापूर ) येथील उपतहसीलदार केंद्रात सध्या विविध पेन्शन विषयक केवायसी व इतर कागदपत्र पडताळणीचे काम सुरू आहे.मात्र अनेक गैरसोईमुळे या केंद्रात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून नागरिकातून नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे मोबाईल रेंज अभावी येथे येणाऱ्या नागरिकांना ओटीपी सारख्या तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे वीज खंडित होताच कार्यालयातील सर्व काम ठप्प होत असल्याने नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. सध्या या उपतहसीलदार कार्यालयात अनेक लाभार्थी नागरिकांच्या संध्या सुरक्षा सारख्या विविध पेन्शन योजना बंद झाल्या असून त्याकरिता सरकारने केवायसी सह विविध कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. त्याकरिता गुंजी महसूल केंद्रात समाविष्ट असणाऱ्या ६९ गावातील नागरिक आपली पेन्शन योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने गुंजी महसूल केंद्राकडे धाव घेत आहेत. ऑनलाईन पडताळणी वेळी प्रत्येक नागरिकांना स्वतःच्या फोन मधून दोन वेळा ओटीपी द्यावा लागत असून सदर ओटीपी वेळी लाभार्थ्यांच्या मोबाईलचा रेंज नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तत्पूर्वी त्यांना येथील वेगवेगळ्या ठिकाणी गुंजी गावात असलेल्या तलाठी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची जमवाजमा करावी लागते. आणि त्यानंतर गावा बाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या उपतहसीलदार केंद्रात जाऊन द्यावे लागते काही वेळा तर गावातील तलाठी कार्यालयातील तलाठी उप तहसीलदार केंद्रात असतात तर काही वेळा तलाठी कार्यालयात त्यामुळे कामानिमित्त आलेल्या अबला वृद्धांना विनाकारण हेलपाटे मारावे लागतात. अशा परिस्थितीत सर्वर डाऊन, खंडित विज, ओटीपी नाही, साहेब नाहीत अशा विविध कारणांनी नागरिकांना ताटकळत राहण्याची वेळ दररोज येत आहे परिणामी दूरवरच्या आणि दुर्गम भागातील लोकांना निर्बंधित वेळेत बस सेवा असल्याने अर्धवट काम सोडून जावे लागत आहे शिवाय याच कामासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशीही किंवा अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तेव्हा लोकप्रतिनिधीनी व तहसीलदानी याकडे जातीने लक्ष देने गरजेचे आहे.
माडीगुंजी तहसील केद्रात सुधारणांची गरज!
गुरुवारी या केंद्रावर आलेल्या शेकडो नागरिकांना खंडित वीज पुरवठ्यामुळे जवळजवळ तीन तास ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे सदर कार्यालयात अनेक सोयींची उणीव भासत असून या गैरसोयी दूर करण्यासाठी प्रशासनाने या कार्यालयात अनेक सुधारणा करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. कारण पावसाळ्यात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो त्यावेळी या कार्यालयातील काम विजे अभावी ठप्प होते अशावेळी सोलार किंवा बॅटरी सारख्या उपकरणावर सदर यंत्रणा कार्यान्वित होण्याची गरज आहे त्याकरिता या ठिकाणी सोलार किंवा बॅटरीची व्यवस्था करणे गरजेचे आहे त्याचबरोबर या कार्यालयातच सर्व गावचे तलाठी उपस्थित असणे गरजेचे असून सर्व तलाठ्याकरिता स्वतंत्र कोठडीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे तसेच सदर कार्यालय गावापासून दूर अंतरावर असल्याने या ठिकाणी रेंजचा सामना करावा लागतो. वेळेवर ओटीपी मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो त्याकरिता सदर कार्यालयात वायफाय सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची उत्तम सोय होणार आहे तरी खानापूर तहसीलदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून या महसूल कार्यक्षेत्रातील जवळजवळ 69 गावच्या नागरिकांची सोय करावी अशी आग्रही मागणी होत आहे.
