#वैदिक व संस्कृत संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
संस्कृत भाषा ही जगातील अत्यंत प्राचीन व समृद्ध भाषा म्हणून ओळखली जाते. पुरातन वाङ्मय, ऋषिमुनींनी केलेले संशोधन तसेच भारतीय ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा संस्कृत भाषेत जतन करण्यात आला आहे. आजही जागतिक स्तरावरील विविध संशोधन संस्था संस्कृत वाङ्मयाचा आधार घेत नवनवीन संशोधन पुढे आणत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबाबत संशोधन व करिअरच्या दृष्टीने आकर्षण वाढताना दिसत आहे.
वेदमूर्ती ज्ञानेश्वर आप्पाजी पाटील यांनी श्रीदत्त पद्मनाभ पीठ, श्रीक्षेत्र तपोभूमी गोवा येथील पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली वैदिक व संस्कृत शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले.
प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यजुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले. तसेच “कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ”, रामटेक (नागपूर) येथून सुवर्णपदक प्राप्त केले. पुढे त्यांनी संस्कृत विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
संशोधन क्षेत्राची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.फिल. पदवी संपादन केली. त्यानंतर गुजरात विद्यापीठातून संस्कृत विषयात पीएचडी पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला.
आपल्या शिक्षणातील व यशातील सर्व श्रेय ते सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाला देतात.
ज्ञानेश्वर आप्पाजी पाटील मूळ खानापूर तालुक्यातील हारुरी गावचे सुपुत्र आहेत व सध्या गोव्यात स्थायिक असून ते सध्या “गोवा विद्यापीठ”मान्यताप्राप्त “स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय”, कुंडई-फोंडा गोवा येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
संस्कृत क्षेत्रात त्यांनी घडविलेली ही प्रेरणादायी शैक्षणिक वाटचाल विद्यार्थ्यांसाठी संशोधन व करिअरच्या दृष्टीने निश्चितच मार्गदर्शक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
