संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी, युवकांमध्ये क्रीडाप्रेम वाढविण्यासाठी आणि दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आनंद, उत्साह व बंधुभाव निर्माण करण्यासाठी तोपिनकट्टी येथे भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खास दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात येणारी ही महालक्ष्मी प्रीमियर लीग (MPL) स्पर्धा शनिवार, दि. ०७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणावर होणार आहेत
ही स्पर्धा खानापूर तालुक्याचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, युवकांमध्ये संघभावना, शिस्त, जिद्द, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती वाढीस लागणार आहे. खो-खो या आपल्या पारंपरिक भारतीय खेळाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या भव्य स्पर्धेत खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट खेळाडूंचाही विशेष पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे.