संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
प्रत्येकाचं जीवन महत्त्वाचे आहे.आपण आपल्या मुलींना पुढच्या आयुष्यात चांगलं आरोग्य लाभावं यासाठी काळजी घेतली पाहिजे.सध्या महिला वर्गामध्ये “सर्व्हायकल कॅन्सर” विस्तारतोय त्यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून बेळगाव रोटरी क्लब साउथ यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थिनींना सर्व्हायकल कॅन्सर लस मोफत देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा. कारण महिलांच्यामध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सर मुळेच दर आठ मिनिटाला एक महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडते. त्यासाठी पॅप स्मिअर तपासणी करणे गरजेचे आहे.आपल्याला भारत देशातून सर्व्हायकल कॅन्सर ची पूर्णपणे विल्हेवाट लावायची आहे.असे मत बेळगावच्या श्री दानेश्वरी मॅटरनिटी अँड जनरल हॉस्पिटलच्या महिला तज्ञ डॉक्टर अनिता उमदी यांनी व्यक्त केले.
कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयात बेळगाव रोटरी क्लब साउथ व इनरल क्लब खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉक्टर उमदी बोलत होत्या. डॉक्टर उमदी पुढे म्हणाल्या की, सर्व्हायकल कॅन्सर हा पूर्वी केवळ पन्नाशी ओलांडलेल्या महिलांच्या मध्ये दिसून येत असे, अलीकडे तीस वर्षे वयाच्या तरुणींमध्ये या आजाराचे प्रमाण चिंताजनक वाढत आहे.म्हणून बेळगाव रोटरी क्लबने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी जागृती तसेच उपाययोजना म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.
विशेषतः नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलींना दोन डोस देणे गरजेचे आहे. तर पंधरा वर्षे ते तीस वर्षे वयाच्या महिलांसाठी तीन डोस आवश्यक आहेत. त्याचबरोबर या सर्वाइकल कॅन्सरची लक्षणे अशी आहेत की महिलांच्यामध्ये पांढरे अंगावर जाणे, दोन पाळीच्या मध्ये अंगावर जाणे, लघवीला वारंवार होणे, वजन कमी होणे अशा प्रकारची विविध लक्षणे आढळून येतात.तेंव्हा महिलांनी दुर्लक्षपणा न करता वेळीच महिला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाययोजना करावी.सरकारी इस्पितळात पॅप तपासणी मोफत आहे तर खाजगी पितळात पाचशे रुपये आकारले जातात. परंतु दुर्गम भागातील महिलांनी किंवा मुलींनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केली तर ती मोफत तपासणीसाठी मी सहकार्य करायला तयार आहे असे डॉक्टर उमदी यांनी सांगितले.
कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयात झालेल्या सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रोटरियन प्रेसिडेंट डॉक्टर गोविंद मिसाळे होते.उपस्थितांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि रोपट्याला पाणी घालून उदघाटन करण्यात आले.यावेळी रोटेरियन इव्हेंट चेअरमन सतीश कुलकर्णी, डॉक्टर संजीव नाईक, रोटरियन अजय भाटिया, डॉक्टर राजश्री मिसाळे, सेरम इन्स्टिट्यूट नितीन देसाई, इनरव्हील क्लबच्या सदस्या शिल्पा कल्याणी, खजिनदार रूपा कुलकर्णी, सविता कल्याणी व फास्ट प्रेसिडेंट शरयू कदम आदी मान्यवर उपस्थित होते.हायस्कूलचे मुख्याध्यापक एस जी चिगुळकर यांनी प्रास्ताविक भाषणात रोटरीच्या लॉटरीने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून उपस्थितांचे स्वागत केले.तर डॉ गोविंद मिसाळे यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी कणकुंबी आणि परिसरातील गावांतील सुमारे पंच्याहत्तर विद्यार्थीनींना मोफत लस देण्यात आली.याप्रसंगी महिला पालक वर्ग, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.इव्हेंट चेअरमन सतीश कुलकर्णी यांनी आभार मानले.

