#रोख ६० हजार रू.रोकड वजीवनोपयोगी साहित्यासह भात, दागिने जळुन खाक!
क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गुंजी गावात रविवारी दि.५ रोजी भर दुपारी शार्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत जीवनोपयोगी साहित्यासह भात, दागिने, रोकड भस्मसात होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले.
गुंजी गावचे शेतकरी शंकर विष्णू घाडी यांच्या मालकीच्या घराला शार्टसर्किटमुळे दुपारी दीडच्या सुमारास घरातील साहित्याने अचानकपणे पेट घेतल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. नेहमीप्रमाणे शंकर घाडी यांच्या पत्नी आनंदी घाडी या बाहेरच्या खोलीत कामात व्यस्त असताना अचानकपणे आतल्या खोलीमध्ये आग दिसून आली . लागलीच गल्लीतील लोकांना आरडा ओरडा करून आगाची माहिती दिली. परंतु दुपारची वेळ असल्याने आणि घरात जळावू लाकडासह ताडपत्री कपडे यांनी पेट घेतल्याने आगीने रौद्र स्वरूप धारण केले. त्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. गावातील तरुणांनी घागरी, बादल्या, कॅन बुट्या अशी मिळेल ती साहित्य पाण्याने भरून घेऊन आगीवर पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले त्यामुळे आजूबाजूच्या घरांचा धोका टळला. त्यानंतर आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी संपूर्ण आग विझविली. मात्र तोपर्यंत घराच्या थाटासह सोनिया चांदीचे दागीने, कपडे,भांडी, कागदपत्रे, भात,आणि रोक रक्कम जळून भस्मसात झाल्याने घाडी कुटुंबावर दु:खाचा डोगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे.
घाडी कुटुंब गरीब असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या झोपडीला आग लागुन म्हशी मरण पावल्या होत्या त्यातून सावरत असतानाच पुन्हा आगीच्या दुर्घटनेत घरही भस्मसात झाले. त्याचबरोबर एकुलत्या एक मुलाला परदेशात कमावता करण्याचे स्वप्न उराशी ठेवून पै पाहुण्यांकडून जमवून ठेवलेली लाखाची रोकड आगीत राख झाल्याने कुटुंबीय हंबरडा फोडून आक्रोश करीत होते. तरी सदर कुटुंबीयांना शासनाबरोबरच संघ, संस्था ,दानी व्यक्तींनी आर्थिक मदत देऊन हातभार लावावा अशी मागणी होत आहे.
