#उपाध्यक्षपदी गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजू पाटील!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका माध्यमिक शाळा नोकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी करंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल कदम तर उपाध्यक्षपदी गणेबैल हायस्कूलचे मुख्या.राजु पाटील यांची बिनविरोध निवड झाली.सदर सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक मागील आठवड्यात बिनविरोध पार पडली होती. २०२६ ते २०३१ पर्यंत होणाऱ्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया दि २७ डिसेंबर पासून सुरू झाली होती. गेल्या सहा पैकी फक्त एक वेळा संचालक मंडळाची निवडणूक झाली होती, इतर पांच वेळा संचालक मंडळाची बिनविरोध निवड झालेली असून यावेळी देखील ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदर सोसायटी स्थापन होऊन २७ वर्षे पूर्ण झालेली आहेत.
यावर्षी पुढील पाच वर्षासाठी झालेल्या संचालक मंडळामध्ये सामान्य गटासाठी सात उमेदवार, महिला दोन,अ वर्ग एक, ब वर्ग एक, अनुसूचित जाती एक व अनुसूचित जमाती एक अशा एकूण १३ जागांसाठी ही निवडणूक होणार होती.सोसायटीचे एकूण १३७ पात्र सदस्य आहेत.यामध्ये तालुक्यातील विविध संस्थांमधील अनुदानित शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सोसायटीचे भागधारक सदस्य आहेत.यावेळी देखील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
सामान्य गटातून अनिल कदम (करंबळ हायस्कूल) एम व्ही सडेकर (जांबोटी हायस्कूल) के.व्ही कुलकर्णी (मराठा मंडळ हायस्कूल खानापूर),पी.ए.पाटील (शिवठाण हायस्कूल)राजु पाटील (गणेबैल हायस्कूल),बी.जी.पाटील (ज्योतीराव फुले विद्यालय गर्लगुंजी)व पी.बी.पाटील (चापगाव हायस्कूल). महिला गटातून अश्विनी पाटील (ताराराणी हायस्कूल) व निलम देसाई (कन्या विद्यालय नंदगड).अ वर्ग गटातून एम.वाय.अचाप्पन्नवर (बेकवाड हायस्कूल),ब वर्ग गटातून एस एम मुतगी (मराठा मंडळ खानापूर) अनुसूचित जाती गटातून जी.के.भंडारी (बिडी हायस्कूल) तर अनुसूचित जमाती गटातून कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने सदर जागा शिल्लक राहिली आहे.एकूण तेरा संचालकापैकी बारा संचालकांची बिनविरोध निवड झाली होती.त्यामधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाल्याने तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.

