#१ नोव्हेंबर काळ्यादिनी खानापूर समितीची शिवस्मारक येथे धरणे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या सत्तर वर्षापासून चाललेल्या लढ्याला यशस्वी पूर्णविराम देण्याची वेळ जवळ ठेपली असून सीमाप्रश्न सुटणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग्ज असून युवा पुढीने सक्रिय सहभाग दर्शवावा,महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्नाच्या लढ्यात आपल्या मूळ तत्त्वांशी कोणतीही तडजोड केलेली नाही. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने हा लढा सुरू असून, सीमाप्रश्न सुटेपर्यंत तो थांबणार नाही. भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी भाषिक बहुल प्रदेश तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून सीमावासीय आपल्या न्याय्य मागणीसाठी संघर्ष करीत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अधिकारी आणि प्रशासनावर दबाव टाकून भाषिक वाद चिघळविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषिकांनी एकजुटीने आणि समितीच्या मूळ तत्त्वांवर ठाम राहून लढा पुढे नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
१ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त रविवारी खानापूर येथील श्री राजा छत्रपती शिवस्मारक सभागृहासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी दहापासून सुरू झालेल्या या उपोषणाचे दुपारी तीन वाजता सभेत रूपांतर झाले. यावेळी झालेल्या सभेत अध्यक्षस्थानी बोलतांना गोपाळ देसाई यांनी सीमालढ्याची पार्श्वभूमी, समितीची भूमिका आणि सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. त्याचबरोबर येत्या काळात युवकांची संघटना मजबूत करून तालुक्यात समितीचे व मराठी भाषिकांचे वर्चस्व कसे अबाधित राहील व सीमालढ्याला बळ देऊया असे संबोधिले.
सभेचे स्वागत आणि प्रस्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी करतांना गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषिक या मागणीसाठी एकत्रितपणे संघर्ष करीत आहेत. आता युवा पिढीही समितीकडे येत असून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याची जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आहे. युवकांच्या सहभागातून समितीचे संघटन अधिक मजबूत होईल. नव्या पिढीला सीमालढ्याचा इतिहास आणि त्यामागील भूमिका समजावून सांगून हा लढा पुढे नेणे आवश्यक आहे असे सांगितले.
समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले, सीमाप्रश्नाचा लढा पुढे नेण्यासाठी समितीचे संघटन अधिक मजबूत करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी युवकांना एकत्र आणून त्यांच्यात सीमाप्रश्नाविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांचे विचार आणि मतभेद बाजूला ठेवून समितीचे ध्येय व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे.
विलास बेळगावकर म्हणाले, समितीच्या मूळ तत्त्वांवरच समितीची स्थापना झाली आहे. आजही त्याच तत्त्वांच्या बळावर समितीचा लढा सुरू आहे. समितीच्या स्थापनेमागील उद्देश आणि भूमिका समजून घेऊन प्रत्येकाने काम करणे आवश्यक आहे. मूळ तत्त्वांशी प्रामाणिक राहूनच सीमाप्रश्नाच्या लढ्याला दिशा मिळू शकते.
खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी भाषिक बहुल प्रदेश तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. त्या निर्णयाच्या निषेधार्थ मराठी जनता दरवर्षी एक नोव्हेंबरला काळा दिन पाळते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. सीमावासीयांच्या भावनांचा विचार करून केंद्र सरकारने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि मराठी भाषिकांना न्याय द्यावा. राष्ट्रीय पक्ष व त्यांचे लोकप्रतिनिधी हे फक्त सत्तेसाठी हापापले असून मराठी भाषा आणि संस्कृतीकडे त्यांचे दुर्लक्ष असते, मराठी माणसाला न्याय फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच देऊ शकते, यासाठी युवावर्गाने समितीच्या पाठीशी राहून बुद्दीभेद करणाऱ्यां पासून दूर राहावे असे आवाहन केले.
कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई म्हणाले, सीमाभागातील मराठी जनता आजही पारतंत्र्याचे जीवन जगत असल्याची भावना व्यक्त करीत आहे. मात्र, समाधानाची बाब म्हणजे आता युवा पिढी सीमाप्रश्नाच्या लढ्यात सहभागी होत आहे. या तरुणांना ज्येष्ठांनी पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढविणे गरजेचे आहे. सीमाभागातील परिस्थिती, मराठी भाषिकांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत प्रसारमाध्यमांनीही वस्तुस्थिती समाजासमोर मांडून जनजागृती करावी.
यावेळी शुभम कांबळे, राजाराम देसाई, रामचंद्र गावकर, हणमंत जगताप, रविंद्र शिंदे, बाबुराव पाटील, आशिष कांबळे, गोपाळ हेब्बाळकर, भास्कर पाटील, कल्लाप्पा घाडी , जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, जगन्नाथ बिर्जे, मारुती परमेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शंकर गवाडा, प्रकाश चव्हाण, रणजीत पाटील प्रल्हाद मादार, नारायण कापोलकर, अमृत शेलार, मारुती गुरुव, यशवंत पाटील, संतोष पाटील, महत्रू ढबाले, वसंत नवलकर, संजीव पाटील, मुकुंद पाटील, ज्योतिबा जगताप, रमेश धबाले, रामचंद्र गावकर, मन्याप्पा पाटील, नागेश भोसले, सदानंद कांबळे, पुंडलिक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
