खानापूर प्रतिनिधी
आत्ताची नवीन पिढी अभ्यासात हुशार आहे ,बुद्धिमान आहे, म्हणूनच एवढे गुण मिळविले आहेत. पण हे यश असेच सातत्याने टिकवून ठेवले पाहिजे. कारण यशात सगळे सहभागी होतात,पण अपयश आले तर सर्वजण पाठ फिरवतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धात्मक युगात आपली मानसिक अवस्था स्थिर ठेवून,कोणत्याही कारणाने खचून न जाता वाटचाल करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल .कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात असे प्रतिपादन रणजीत चौगुले यांनी केले आहे.
येथील मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात मराठी भाषा प्रेरणा मंचच्या,मराठी प्रेमी संस्थेच्या वतीने दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते .
विद्यानिकेतनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळ पाटील हे होते .
सुरुवातीला अभियंता अशोक चौगुले यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला,व उपस्थितांचे स्वागत केले.तर डॉक्टर गोपाळ पाटील व अभियंता अरुण कदम यांनी व्यासपीठावरील पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तर रोटरी क्लब ऑफ वेनुग्रामचे अध्यक्ष निवृत कार्यकारी अभियंता शशिकांत नाईक यांनी कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी गुणी विद्यार्थ्यांना आर.के.पाटील,सुरेश पाटील,मालोजी अष्टेकर व पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम,प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बेळगाव शहर,बेळगाव ग्रामीण व खानापूर तालुक्यातील एकूण 45 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.बेळगाव तालुक्यातील चौदा आणि खानापूर तालुक्यातील अकरा शाळांच्या मुख्याध्यापकांचाही पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर यावर्षी ,महात्मा फुले आदर्श शाळा हा पुरस्कार बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन शाळेला मिळाला.त्यामुळे हा विशेष पुरस्कार मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांना शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.
यानंतर मी कसे साध्य केले ?याविषयी गुणी विद्यार्थ्याशीथेट संवाद झाला.त्यानंतर दहावी नंतरच्या वाटा,याविषयी मुंबई येथील आय.आय.टी.चे प्रा.डॉ.गोपाळ पाटील यांनी विद्यार्थी , पालक,आणि शिक्षक यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि शंकांचे निरसनही गोपाळ पाटील यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत सुभेदार मेजर मधु पाटील,परशराम कंग्राळकरआणि आर.के.निलजकर यांनी विशेष प्रयत्न केले.
रोटरी क्लब ऑफ विनुग्रामचे माजी अध्यक्ष डी.बी.पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर मराठी भाषा प्रेरणामंचे सदस्य शिवाजी हसनेकर यांनी आभार मानले.
