#जणजागृतीसाठी मोहिमेचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कोकण आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांचे अस्तित्व हे जंगल, जमीन,जल म्हणजे नद्या,झरे, देवराया,शेती, स्थानिक अन्न व्यवस्था आणि निसर्गाशी निगडीत जीवनपद्धतीवर अवलंबून आहे.आज विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचे वाढते शोषण यामुळे आपल्या समोर म्हणजे भूमी, पाणी, संस्कृती आणि भविष्यासमोर गंभीर आव्हाने उभी आहेत.
या पार्श्वभूमीवर राखणदार पदयात्रा ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.त्याची सुरुवात कणकुंबीच्या श्री माऊली देवी मंदिरापासून मलप्रभा नदीच्या पवित्र जलाभिषेकांने करण्यात आल्यानंतर “रानमाणूस” फाऊंडेशनचे अध्यक्ष व पर्यावरणप्रेमी प्रसाद गावडे यांनी ही माहिती दिली.
नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणासाठी ‘कोकणी रानमाणूस’ म्हणून परिचित असलेले पर्यावरणप्रेमी प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘राखणदार यात्रेला’ शनिवारी सकाळी दहा वाजता कणकुंबी पासून प्रारंभ करण्यात आला. जल, जंगल, जमीन आणि स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा यात्रेचा प्रमुख उद्देश घेऊन या राखणदार पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
*#कोकणचो राखणदार कणकुंबीत दाखल !
कोकणातील निसर्ग आणि संस्कृती याचे रक्षणार्थ आपल्या कोकणातील चालीरीती, रूढी परंपरा आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली ही नैसर्गिक संपती याचे जतन करण्याकरिता कोकणातील महाराष्ट्र जिल्ह्यातील सिंधुदुर्गातील राखणदार फाउंडेशनच्या वतीने कणकुंबी श्री माऊली देवस्थान येथील मलप्रभा नदीच्या उगमापासून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.यासंदर्भीत सर्वप्रथम श्री माऊली देवी मंदिरात गार्हाणे घालण्यात आले.यावेळी कणकुंबीचे प्रतिष्ठित राजाराम गावडे,विल्डरनेस्ट रिसॉर्टचे मालक कॅप्टन नितीन धोंड, शतावरी रिसॉर्टचे किरण गावडे,व कणकुंबी गावातील मान्यवर व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पत्रकार सुनील चिगुळकर यांनी प्रास्ताविक करुन राखणदार पदयात्रेतील सर्व पर्यावरण प्रेमिंचे स्वागत केले.आठदिवसापूर्वी रान माणूस फाऊंडेशन तर्फे कणकुंबी माऊली मंदिराकडे येऊन त्याबाबत अधिकृत पत्र देवस्थान मंडळाकडे दिले होते.तसेच कणकुंबी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे निवेदनाद्वारे आवाहन केली होते.
पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या कणकुंबी गावातून सुरू होणारी ही यात्रा विविध गावांमधून मार्गक्रमण करत गोवा केरी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्लीपर्यंत पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान स्थानिक नागरिक, शेतकरी, युवक आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधून जंगल संवर्धन, जलस्रोतांचे जतन, जैवविविधतेचे महत्त्व आणि शाश्वत विकास याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
अलीकडच्या काळात वाढते जंगलतोडीचे प्रमाण, जलस्रोतांवरील ताण, खाणकाम आणि विविध विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा महत्त्वाची मानली जात आहे. पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती यांचे नाते जपत विकासाचा मार्ग शोधण्याची गरज यात्रेद्वारे अधोरेखित केली जाणार आहे.
पर्यावरणप्रेमी प्रसाद गावडे यांनी गेल्या काही वर्षांत कोकणातील निसर्ग, ग्रामीण जीवनशैली, स्थानिक अन्नसंस्कृती आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर सोशल मीडियाद्वारे व्यापक जनजागृती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना निसर्ग संवर्धनाशी जोडण्याचे काम केले असून ‘राखणदार यात्रा’ हा त्या अभियानाचाच पुढचा टप्पा मानला जात आहे.
यात्रेत सहभागी होण्यासाठी पर्यावरणप्रेमी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, “निसर्गाचे रक्षण हीच भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी” हा संदेश यात्रेद्वारे दिला जाणार आहे.
