संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूरचे आमदार याच्या
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला यंदाचा आदर्श शाळा पुरस्कार खानापूर तालुक्याचे आमदार व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते मुख्याध्यापक एस डी पाटील व एस डी एम सी अध्यक्ष हुवाप्पा गुरव ,तसेच सदस्य यांचा मानचिन्ह,
प्रशस्ती व शाल, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
तोपिनकट्टी या शाळेने भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यावर्षीचा तालुकास्तरीय ‘आदर्श शाळा’ पुरस्कार प्राप्त केला आहे. शाळेच्या या यशामुळे तोपिनकट्टी गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सध्या कार्यरत असलेल्या शाळा सुधारणा व व्यवस्थापन समिती (SDMC), शिक्षकवर्ग आणि पालकांच्या अथक प्रयत्नातून शाळेचा गेल्या काही काळात आमूलाग्र कायापालट झाला आहे. शाळेच्या भौतिक व शैक्षणिक सुधारणांसाठी जवळपास १० लाख रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये शालेय इमारतीचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरूम तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध मूलभूत सुविधांची उत्तम प्रकारे निर्मिती करण्यात आली आहे.
शाळेच्या शैक्षणिक विकासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे एल.के.जी. वर्गाची सुरुवात. सध्या एल.के.जी.मध्ये तब्बल ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून संपूर्ण शाळेची पटसंख्या १८८ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यात शाळा सुधारणा व व्यवस्थापन समितीबरोबरच पालकवर्गाचेही मोलाचे योगदान आहे.
खानापूर तालुक्याचे आमदार यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे शाळेच्या शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळत आहे. त्यांच्या सहकार्यामुळे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांना बळ मिळाले आहे.
शाळेचे विद्यार्थी विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असून प्रतिभा कारंजे, क्रीडा स्पर्धा आदी विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी एस.डी.एम.सी.च्या पुढाकाराने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
सध्या शाळेत ६ कायमस्वरूपी शिक्षक व ४ अतिथी शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील आणि एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष श्री. हुवापा गावडू गुरव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवर्ग, समिती आणि पालकांच्या एकत्रित प्रयत्नांतून शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.
“शाळेचा विकास हा केवळ इमारतींच्या विकासात नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात आहे,” या ध्येयाने शाळेची वाटचाल सुरू असून, तोपिनकट्टीची ही सरकारी शाळा ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
तालुकास्तरीय ‘आदर्श शाळा’ पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवर्ग, शाळा सुधारणा व व्यवस्थापन समिती, पालकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
