#१७० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरव!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि कलेविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय चित्रकला व हस्तकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चापगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विविध शाळांतील १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व चषक देऊन कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिराजी कुराडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे!
यावेळी मनोगत व्यक्त करताना दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे समन्वयक तथा निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व विशद केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने क्रीडा महोत्सवासारख्या विविध उपक्रमांबरोबरच आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“कला प्रत्येकाच्या अंगी जन्मजात असतेच असे नाही; मात्र योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थ्यांमधील कलागुण निश्चितच विकसित होतात. शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद मलप्रभा हायस्कूल, चापगावने स्वीकारून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शाळेचे कौतुक केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
कार्यक्रमात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे समन्वयक तथा बेनकनहळ्ळी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक पी. आर. पाटील, सुंडी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एस. बी. पाटील, सिव्हिल इंजिनिअर सुधीर पाटील, उद्योजक नागराज यळूरकर, मारुती चोपडे, हाडाचे वैद्य रोशन पाटील, निवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पाटील आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य पी. के. चापगावकर आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सुधीर पाटील, भालचंद्र पाटील आणि अध्यक्ष पिराजी कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन संजय बेळगावकर, विजय कडबी, पांडुमामा पाटील, मष्णू सुतार, रमेश घारसी, कलाप्पा पाटील, नारायण जांबोटकर, रुक्मणा धबाले, अनिल बेळगावकर, मष्णू चोपडे, शिवस्मारक ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य बी. बी. पाटील आणि पुंडलिक पाटील करंबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी परिसरातील प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेतील विजेते
चित्रकला स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले : प्रथम क्रमांक : रोशन अशोक सुतार — कुद्रेमनी हायस्कूल, द्वितीय क्रमांक : विकी विक्रम पाटील — मुतगे हायस्कूल तृतीय क्रमांक : अवनी जाधव — मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
हस्तकला स्पर्धेतील विजेते
हस्तकला स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले :
प्रथम क्रमांक : स्मृती गो. बामणे — गोजगे हायस्कूल,
द्वितीय क्रमांक : स्नेहल भा. पाटील — मंडोळी हायस्कूल,
तृतीय क्रमांक : अक्षता तोरगल — मलप्रभा हायस्कूल, चापगाव
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल ज्योत्स्ना हंगीरगेकर हिचाही विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा देणारी ठरली. विविध शाळांतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक तुकाराम सनदी यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे चित्रकला शिक्षक व इतर शिक्षक व शाळा व्यवस्थापन कमिटीचे विशेष प्रयत्न लाभले.