संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नुकताच खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अबनाळी गावच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातून एकंदरीत ९ विद्यार्थी अंतिम फेरीत विजय संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
अबनाळी प्राथमिक शाळेचे वेदांत रमेश गावकर, राधिका मष्णू लाड, अश्विनी पंडित डीगेकर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी परशराम नामदेव गावकर, सानिका संदीप कोवाडकर, सानिका संतोष गावकर ( सरकारी माध्यमिक विद्यालय शिरोली ) सतीश श्रीकांत सावंत, वर्षा विलास मेंडीलकर ( मराठा मंडळ हायस्कूल खानापूर ), कृष्णा राघोबा मेंडीलकर ( सिद्धिविनायक हायस्कूल खानापूर) असे एकूण अबनाळी गावच्या नऊ विद्यार्थ्यांची बैलहोंगल इथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भीमगड अभयारण्यात वसलेले अबनाळी हे तालुक्यातील अतिशय दुर्गम प्रदेशातील गाव आहे. मात्र येथील विद्यार्थ्यांची बुद्धिबळ खेळातील प्रतिभा कौतुकास्पद आहे. कारण गेली दहा वर्षे येथील विद्यार्थी सातत्याने जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करतात.
याचे श्रये शाळेचे मुख्याध्यापक रमेश कवळेकर यांना जाते.कारण यांच्या मार्गदर्शनाखाली अबनाळीचे नाव राज्यस्तरावर चमकत आहे.
या यशाबद्दल खानापूर तालुक्याचे प्रभारी बीईओ मंजुनाथ हत्ती, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन चवलगी, प्रधान कार्यदर्शी बाळासाहेब चापगावकर, शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम गावकर, उपाध्यक्षा निता निवृत्ती गावकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.