संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सीमाभागातील प्रलंबित प्रश्न आणि आगामी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची कार्यकारिणी बैठक सोमवार, दि. २५ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारक येथे ही बैठक पार पडणार असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीत १ जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानासमोर करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर सीमाभागात सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात मोर्चा काढण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या “एक लाख सह्या” अभियानाचाही बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. ज्या सभासदांकडे सह्यांची पुस्तके आहेत, त्यांनी ती तातडीने समिती पदाधिकाऱ्यांकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी दिली.
