संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दहावीच्या फेर तपासणीचा निकाल दिनांक १६ मे रोजी जाहीर झाला असून या निकालात मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनी कुमारी जानवी शामराव पाटील हिने दैदिप्यमान यश संपादन करत ६२५ पैकी तब्बल ६१७ गुण मिळवून ९८.७२ टक्के गुणांसह कर्नाटक राज्यात मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
जानवीच्या या उज्ज्वल यशामुळे ताराराणी हायस्कूलच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. तिच्या अथक मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे हे यश असून संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थिनीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू मॅडम, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शिवाजीराव पाटील, परशुराम अण्णा गुरव, मुख्याध्यापक राहुल एन. जाधव, शिक्षकवृंद तसेच पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ताराराणी हायस्कूलच्या या घवघवीत यशामुळे मराठी माध्यमाच्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
