# दोन्ही बहिणी तहसील कार्यालयाचे उंबरे झीजवत आहेत.
#अधिकार्याची उडवाउडवीची उत्तरे!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गुंजी ( ता.खानापूर ) येथील स्टेशन क्रॉस जवळ राष्ट्रीय रस्त्या शेजारी असलेल्या झोपडी वजा घरामध्ये जन्मापासुन वास्तव्यास असलेल्या निराधार सख्ख्या बहिणी शोभा कडोलकर व रेणुका कडोलकर आता महामार्गात घर गेल्याने बेघर झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला या घराच्या बदल्यात भरपूर पैसे देणार आहोत असे सांगूनमहामार्गाच्याविस्तीरीकरणासाठी त्यांचे निवासस्थान जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले. वास्तविक याच घरात शोभा ही छोटासा चहाचा व्यवसाय करून दोघींचा उदरनिर्वाह चालवत होत्या मात्र महामार्गात घर गेल्याने आश्रय आणि उदरनिर्वाहाचे साधनही गेल्याने त्यांच्यावर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. अनेक वेळा अधिकाऱ्यांना विचारून देखील त्यांना त्यांच्या घराचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने त्या अजूनही दारोदार हिंडत आहेत. रेणुका ही मुकी आणि दिव्यांग आहे. त्यामुळे मोठी बहीण म्हणून शोभा हिलाच रेणुकाची देखभाल करून उदरनिर्वाह करावा लागतो. वास्तविक शोभा हिच्या नावे काही रक्कम तिच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये नोंद असली तरी तिला ती अद्याप मिळालेली नाही असे तिचे म्हणणे आहे त्यामुळे तिने आज खानापूर तहसीलदार कार्यालयात ठाण मांडून आपली व्यथा व्यक्त केली आहे.
