#वर्ष भरापासुन रस्ता उखडलेला आहे.त्याकडे दुर्लक्ष!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील लालवाडी ते चापगाव दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून दीर्घकाळापासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या मते, रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून कामात अनेक त्रुटी दिसून येत आहेत. त्यामुळे भविष्यात रस्ता टिकाऊ राहील का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. अपूर्ण कामामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून वाहतुकीसाठी तो धोकादायक ठरत आहे.
वर्षभरा पासुन उखडलेल्या रस्याकडे दुर्लक्ष!
गेल्या वर्ष भरापासुन उखडलेल्या रस्त्यामुळे व उडणाऱ्या धुळीमुळे परिसरात प्रदूषण वाढले असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होत असल्याची तक्रार आहे. रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
सदर परिस्थितीबाबत वारंवार विनंती व अपेक्षा व्यक्त करूनही कामाच्या गतीत किंवा गुणवत्तेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत खानापूरातील शिवस्वराज संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली असून रस्त्याच्या कामाची तात्काळ तपासणी करून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, काम जलद गतीने पूर्ण करावे, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक असल्यास कंत्राटदार बदलण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी अन्यथा धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शिवस्वराज संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई, उपाध्यक्ष रमेश धबाले, खजिनदार मुकुंदराव पाटील, रणजित पाटील, नागेश भोसले, संदेश कोडोचवाडकर, सुनील पाटील, प्रभु कदम, मिलींद देसाई इत्यादींनी ही बाब अधिकाऱ्यांकडे मांडली.

