संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यांसह बेळगाव, गोवा व चंदगड तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थानवर महाशिवरात्री निमित्त दि.१५ व दि.१६ फेब्रुवारी असे दोन दिवस महायात्रोत्सव होणार असून त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवानिमित रविवार दि.१५ रोजी सकाळी श्रीसमोर काकड आरती व अखंड हरिभजन होणार आहे. त्यानंतर श्री स्वयंभू मारुती पूजन,श्रीराम सिता श्री मुर्तींचे पूजन,श्री शिवलिंग पूजन,श्री विठ्ठल रुक्मिणी पूजन व गंगापूजन अशा विविध देवदेवतांचे पूजन होणार आहे. त्यानंतर भाविकांना श्री चे दर्शन घेता येणार आहे.
दोन दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री अकरा वाजता सुर्ला सत्तरी गोवा येथील तरूण नाट्य मंडळाचा तीन अंकी पौराणिक “चक्रव्यूह ” या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.१६ रोजी सकाळी श्रीसमोर अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम.दिवसभर भाविक भक्तांना श्री दर्शनासाठी नियोजन व सायंकाळी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
हब्बनहट्टी देवस्थानवर महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित कर्नाटक,महाराष्ट्र व गोवा अशा तीन राज्यांमधून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. देवस्थान कमिटीच्या वतीने देवस्थान परिसरातील देवाचीहट्टी आणि हब्बनहट्टी गावच्या दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटर अंतरावर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात्रोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याचा पाण्याची व्यवस्था म्हणून दोन ते तीन टँकर उभारण्यात येणार आहेत.त्याचबरोबर श्री च्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी स्वयंसेवक व विशेष पोलीस पथक मागवण्यात आले आहे.तसेच खानापूर आगारातील जांबोटी ते हब्बनहट्टी अशी बससेवा उपलब्ध असणार आहे.यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटीने विशेष उपाययोजना केली आहे.
