
#२५ कर्नाटक बटालियन कमांडिग आँफिसर कर्नल सुधांशू दिक्षित,सुभेदार मेजर हरदेव सिंग याची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटला बेळगाव, कारवार जिल्हा आणि गोवा राज्याचे एनसीसीचे ग्रुप कमांडर कर्नल मोहन नाईक यांनी सदिच्छा भेट नुकताच दिली.
यावेळी २५ कर्नाटका बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुधांशू दीक्षित व सुभेदार मेजर हरदेव सिंग उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. आय. एम. गुरव यांनी केले. ग्रुप कमांडर कर्नल मोहन नाईक यांनी एनसीसी छात्रांना संबोधन करताना भारतीय सेनेचे महत्व समजावून दिले. “भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे. याची प्रचिती प्रत्येक भारतीय सेनेत दाखल झालेला जवान घेत असतो. भिन्न भाषा संस्कृती असलेल्या या देशात एनसीसी चे योगदान फार मोठे आहे. एनसीसी मधून प्रशिक्षित झालेला छात्र भारतीय सेनेत दाखल होतोच शिवाय नोकरी, व्यवसाय आणि राजकारण या क्षेत्रात देखील विशेषत्वाने आपला ठसा उमटवताना दिसतो आहे. एनसीसीच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान देशसेवे सोबत समाजसेवेचे जीवनात आचरण कसे करावे याचे विशेषत्वाने मार्गदर्शन दिले जाते. खानापूर तालुका हा दुर्गम तालुका असल्याने इथे बहुतांश समाज खेडोपाड्यांमध्ये राहतो. जातीने मराठा असलेला समूह तालुक्यात मोठ्या प्रमाणात राहतो. मराठ्यांच्या रक्तातच लढवय्या वृत्ती असते. याचे प्रतीक म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावांमधून असंख्य जवान भारतीय सेनेत देश सेवा बजावत आहेत. महाविद्यालयातील एनसीसी छात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात भारतीय सेनेत दाखल होतात. विशेष म्हणजे मुली देखील भारतीय सेनेत मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. ही अत्यंत कौतुकाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी प्रा. कपिल गुरव, डॉ. सुनंदा कुरनी, गणपती मिराशी यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग व एनसीसी छात्र बहुसंख्येने यावेळीउपस्थित होते. आभार एनसीसी अधिकारी डाॅ.आय.एम.गुरव यानी मानले