
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
जांबोटी ( ता. खानापूर ) येथील विश्व भारत सेवा समितीच्या जांबोटी विद्यालयात
आर्ट ऑफ लिविंग यांच्या “आंतरराष्ट्रीय मानवी मूल्य संस्था”(IAHV) यांच्याकडून वाचनालयासाठी पन्नास हजार रुपयांच्या पुस्तकांची देणगी देण्यात आली. रविशंकर जी यांच्या प्रेरणेतून मराठी, इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषेतील दर्जेदार साहित्यिकांची सुमारे साडेपाचशे पुस्तके विद्यालयाकडे नुकताच सुपूर्त करण्यात आली.
शिवाय “युनिक फ्युचर”या चे कडून दहा हजार रुपयांचे पुस्तके देण्यात आली त्या मुळे वाचनालय समृद्ध बनले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळी होते.
कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवनानंतर आर्ट ऑफ लिविंग चे अनुयायी रवी हिरेमठ यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले. मान्यवरांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विजय नंदीहळ्ळी ,रवी हिरेमठ व दत्तात्रय लवटे कोल्हापूर यांच्या हस्ते फीत कापून व दिपप्रज्वलन करून ग्रंथदालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्योतिर्लिंग हायस्कूल कसबा बोरगाव कोल्हापूर येथील निवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक श्री दत्तात्रय लवटे (कोल्हापूर) म्हणाले” पुस्तके ही जीवन जगण्याची कला शिकवितात, त्यामुळे वाचनाची आवड जोपासणे ही आजची गरज आहे. मातृभाषेचे सौंदर्य पहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पुस्तकांची मैत्री केली पाहिजेत. म्हणून या पुस्तकांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. यावेळी त्यांनी अनेक कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आणि निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर डी.एस. लवटे यांनी कविता सादर केल्या.आर्ट ऑफ लिविंगच्या प्रतिनिधी कुमारी पूजा माळी सौ.शोभा लवटे, रवी हिरेमठ विजय नंदीहळ्ळी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. ही पुस्तके मिळवण्यासाठी श्रीमती संपदा तिरविर यांनी विशेष प्रयत्न केले त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. अमर निवृत्ती कदम, विकास जयसिंग डांगे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी केले, सहशिक्षक तुकाराम सडेकर यांनी सूत्रसंचालन व दिनकर पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.