वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे #संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचाल सुरूच!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ एज्युकेशन सोसायटी संचालित समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाला आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. अल्पावधीतच खानापूर परिसरात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शाळेच्या विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संचालक मंडळाने शाळेच्या इमारतीचा तिसरा मजला उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२७ सुरू होण्यापूर्वी हे बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
सन २०११ पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळा सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. वाढत्या विद्यार्थी संख्येच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तिसऱ्या मजल्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
या बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी शाळेचे चेअरमन एफ. एम. पाटील, सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा, संचालक डॉ. एन. एल. कदम, बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर दिलीप, इंजिनिअर प्रसाद चोपडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या या विस्तारामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, आगामी काळात समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अधिक मोठी भरारी घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.