संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील शिवस्मारक भवनात मगंळवारी दि.६ रोजी गृहलक्ष्मी पुनर्पडताळणीबाबत अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम महिला व बालविकास विभागाच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंच हमी योजनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते.
कार्यक्रमाला तालुका गॅरंटी योजना समितीचे सदस्य, एसीडीपीओ शारदा मराठे, एफडीसी स संदीप देशमुख, सुपरवायझर सरस्वती बडसरी, मंजुळा टोनी, सौम्या, अमृता डब, मंजुळा कुलकर्णी, यालवा केसरूर, जयश्री कानोजी, सुरेखा पाटील यांच्यासह सर्व विभागांतील पर्यवेक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील सुमारे १५० अंगणवाडी शिक्षिकाही या प्रशिक्षणाला उपस्थित होत्या.
प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ पर्यवेक्षिकांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर पर्यवेक्षिकांनी गृहलक्ष्मी योजनेच्या पुनर्पडताळणीबाबत अंगणवाडी कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली. केवायसी कशी करावी, तसेच गृहलक्ष्मी योजनेशी संबंधित इतर अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली.
मार्गदर्शन करताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले, “अंगणवाडी शिक्षिका व सेविका यांच्यावर कामाचा मोठा भार असूनही त्या आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात. अंगणवाडीच्या समस्यांबाबत पंच हमी आढावा बैठकीत तक्रार निवारणावर भर दिला जातो. पुनर्पडताळणीचे काम अचूक व योग्य पद्धतीने करावे. कोणताही त्रास झाल्यास किंवा अडचण आल्यास अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.”
शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.