वंधत्व उपचाराबाबत जनजागृती
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
वंधत्व उपचाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ओअँसिस जननी यात्रा मोबाईल फर्टिलिटी क्लिनिकचे उद्घाटन शुक्रवारी दि.७ रोजी खानापूरात उत्साहात पार पडले.
या उपक्रमाचे उद्घाटन लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून , भाजपचे नेते राजेंद्र रायका, खानापूर तालुका डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नाडगौडा, उपाध्यक्ष डॉ. मदन कुंभार, खानापूरचे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुदर्शन सुळकर, भाजपचे सचिव गुंडू तोपिनकट्टी, सदानंद मासेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर नाडगौडा यांनी वंधत्व ही लाज बाळगण्याची किंवा गोंधळून जाण्याची बाब नसून, पुरुष व स्त्री या दोघांनीही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून आधुनिक वैद्यकीय उपचारांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केले. आज आययूआय, आयव्हीएफसह अनेक अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असून, ओयासिस इन्फर्टिलिटी सेंटरसारख्या तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून अनेक दाम्पत्यांच्या आयुष्यात आशेकिरण निर्माण होत आहे. त्यामुळे गरजू दाम्पत्यांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर डॉ. श्वेता सोनवलकर यांनी उपस्थितांना वंधत्वाची कारणे, आवश्यक तपासण्या, आययूआय, आयव्हीएफ तसेच सध्याच्या अत्याधुनिक फर्टिलिटी उपचारपद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून योग्य वेळी उपचार घेतल्यास यशाचे प्रमाण वाढते, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचा परिचय श्री. इनामदार यांनी करून दिला. त्यानंतर सर्व मान्यवरांचा शाल, मैसुरी हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमामुळे खानापूर व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वंधत्व उपचारांविषयी जागरूकता निर्माण होऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध होणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
