संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
किरहलशी (ता. खानापूर) येथील ज्येष्ठ, सीमा तपस्वी कै. श्री परशराम लक्ष्मण पाटील (वय ९४) याचेआज दिनांक २९ रोजी पहाटे ५-४५ वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. हलगा येथील श्री कलमेश्वर को. ऑप. सोसायटीचे ते माजी संस्थापक संचालक तसेच या परीसरातील नामवंत भाताचे व्यापारी (दलाल) या नावाने ओळखले जायचे.
स्वतःला जरी ज्यास्त शिक्षण घेता आले नाही, मात्र शिक्षणावर नितांत प्रेम करणारे की स्वतःच्या मुलांनी खुप शिकावं शेतीसह नोकरी ही करावी असा त्यांचा आग्रह होता. स्वतःचा व्यवसाय सांभाळून उत्तम शेती आणि गोरगरीब लोकांना मदत करणे आडले-नडलेल्यांच्या लग्ना- व्हराडामध्ये आर्थिक मदत करणे. कुणाला कधीच मोडून तोडून अथवा वेडवाकडं न बोलता शांत, संयमी स्वभावाचं व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड झाले आहे.
आपला भाताचा व्यापार करतांना नंदगड येथील प्रसिद्ध समाजसेवक कै. बस्सापण्णा अरगांवी, भाताचे व्यापारी कामशेट्टी, गुंजीकर यांसारख्या लोकांच्या सोबत उत्तम व्यवसाय करुन आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ निर्माण केला होता.
स्वतःचे शिक्षण मात्र चौथीपर्यंत पण आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन दोघांना माध्यमिक शिक्षक तर एकट्याला पतसंस्थेत कर्मचारी म्हणून सेवेत रुजू केले. मराठा मंडळ माध्यमिक शाळेतील निवृत्त शिक्षक श्री एस. पी. पाटील व बिडी येथील नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एल. पी. पाटील तर हलगा श्री कलमेश्वर को.ऑप. सोसायटीचे कर्मचारी श्री एम. पी. पाटील यांचे वडील आणि बेळगाव सरकारी प्राथमिक मराठी शाळा नं ३६ च्या मुख्याध्यापिका सौ. विद्या एल. पाटील यांचे सासरे व चन्नैवाडी येथील शिक्षक कै. निवृत्ती तुकाराम पाटील यांचे सासरे होत.
त्यांच्या पश्चात तीन करते चिरंजीव एक विवाहित मुलगी, एक भावजय, चार नातू व दोन नाती मुलीकडून दोन नाती व एक नातू असा परीवार असून एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता.
आज दिनांक २९ जानेवारी रोजी किरहलशी येथे दुपारी १-१५ वा. त्यांचा अंत्यविधी होणार आहे.