संदेश क्रांती न्यूज:

खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता.खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश मिळवले. पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव व के. एल. ई. कॉलेज खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील सांघिक प्रकारात शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी खोखो या खेळात माऊली कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पराभव करत प्रथम येत सुवर्णपदक मिळविले. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच हॉलीबॉल या खेळ प्रकारात द्वितीय येत रजत पदक मिळविले. हॉलीबॉल खेळातील उत्तम खेळामुळे चार खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
वैयक्तिक खेळामध्ये अकरावीची विद्यार्थिनी कुमारी सौंदर्या हलगेकर हिने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम येत सुवर्णपदक जिंकले. तसेच मुलांच्या वैयक्तिक खेळात कुमार समर्थ कदम यांने 400 मीटर धावणे व 400 मीटर हर्डल मध्ये प्रथम येत सुवर्णपदक जिंकले. तसेच 110 मीटर हर्डलमध्ये द्वितीय येत रजत पदक जिंकले. ट्रिपल उडी मध्ये कुमार शुभम चव्हाण याने प्रथम येत सुवर्ण पदक जिंकले. लांबउडीमध्ये कुमार रोहन चौगुले याने प्रथम येत सुवर्ण पदक जिंकले. तसेच महाविद्यालयाच्या खेळाडूंनी 4×400 मीटर रिलेमध्ये प्रथम आणि 4×100मीटर मध्ये द्वितीय येत सुवर्ण व रजत पदक मिळविले.
या यशाबद्दल खानापूर तालुक्याचे आमदार व श्री महालक्ष्मी ग्रुप सोसायटी तोपिनकट्टीचे संस्थापक-अध्यक्ष श्री विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ज्यांची निवड झाली त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सेक्रेटरी श्री आर. एस. पाटील सर, संचालकवर्ग व महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा निलजकर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सर्व खेळाडूंना प्राचार्या व प्राध्यापक वर्ग यांचे प्रोत्साहन मिळत आहे.